सोलापूर : सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कसब्यातील कुंभार कन्येच्या माहेरांकडून ५६ मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द केल्या. यात कुंभार समाजातील महिलांसह भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
१२ व्या शतकात कुंभार वाड्यातील कुंभार कन्येचा कसब्यातील सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाशी प्रतीकात्मक विवाह झाला होता. आजही परंपरेनुसार संमत्ती भोगीच्या दिवशी विवाह सोहळा पार पाडला जातो. प्रारंभी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कुंभार वाडा येथे प्रमुख मानकरी योगीराज कुंभार यांनी कुंभार वाड्यातील गणपती व सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर दीप बसवण्यात आले. त्यानंतर हलगीच्या कडकडाटात व सनईच्या मंजूळ स्वरात ५६ मातीच्या घागरी मिरवणुकीने कुंभार वाड्यातून हिरेहब्बू वाड्यात आणण्यात आल्या. मानकरी योगीराज शिवलिंग कुंभार यांच्याकडून मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडे मातीच्या घागरी सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी योगीराज कुंभार, रेवणसिद्ध म्हेत्रे-कुंभार, चंद्रशेखर म्हेत्रे, भीमाशंकर म्हेत्रे, सुरेश म्हेत्रे यांच्यासह समाजातील सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या.
श्री सिद्धेश्वर पूजा स्थानाला नैवद्य
१२ व्या शतकात श्री सिद्धेश्वर महाराज ज्या ठिकाणी बसून पूजा करत होते, त्या ठिकाणी शिवलिंग आहे. ते स्थान कसब्यातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात आहे. मातीच्या घागरी घेऊन आल्यानंतर सिद्धामेश्वर महाराज पूजास्थानाच्या येथील शिवलिंगाचे पूजन करून नवैद्य दाखविण्यात आला.
















