तेलंगणा : रेल्वे ग्राऊंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये आज खेळ, वेग, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने तेलंगणा खो-खो असोसिएशन आयोजित या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील सामन्यांनी चांगलीच रंगत आणली. महिलांमध्ये तेलंगणा व आसाम, तर पुरुषांमध्ये विदर्भ व हरियाणा संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने मात करत आपले वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले.
महिला गट : यजमान तेलंगणाचा जल्लोष : ऑल इंडिया पोलिसवर निर्विवाद विजय
यजमान तेलंगणा संघाने महिला गटातील लढतीत ऑल इंडिया पोलिसचा २८–८ असा एक डाव २० गुणांनी सहज पराभव करत गटात पहिला विजय नोंदवला. तेलंगणाकडून अखिला (३.१० मि. संरक्षण व २ गुण) आणि अनुषा के. (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी सलग दमदार कामगिरी नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. तर पोलिस संघाकडून रमणदीप कौर (१.२० मि. संरक्षण, २ गुण) हिने चांगला प्रतिकार केला.
महिला गट : आसामची धडाकेबाज सुरुवात : जम्मू-काश्मीरवर एकतर्फी मात
महिला गटातील सामन्यात आसामने जम्मू-काश्मीरचा एक डाव २० गुणांनी (२८–८) सहज पराभव केला. आसामकडून रांजणा (३.१० व १.३० मि. संरक्षण, २ गुण) आणि कल्याणी (५.१० मि. संरक्षण) यांनी भक्कम संरक्षण करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली, तर जम्मू-काश्मीरकडून रूची माला (१.२० व १.४० मि. संरक्षण, ४ गुण) हिने झुंजार खेळ केला.
मध्यभारतचा झंझावात : बिहारवर मोठ्या फरकाने विजय
आणखी एका सामन्यात मध्यभारत संघाने बिहारचा एक डाव ३६ गुणांनी (४०–४) धुव्वा उडवला. मध्यभारतकडून रोहिणी (२.२० व ३.५० मि. संरक्षण, ६ गुण) आणि ईरा भट्ट (४.४० मि. संरक्षण) यांनी अप्रतिम खेळ करत सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवले.
पुरुष गट : विदर्भाची गोव्यावर एकतर्फी विजय
पुरुष गटात विदर्भ संघाने आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत गोव्याचा ३८-४ असा ३४ गुण व एक डाव राखून धुव्वा उडवला. विदर्भकडून दिलराज सिंग (२.५० मि. संरक्षण व ८ गुण) याने आक्रमणात आघाडी घेतली, तर फैजल खान (३.४० मि. संरक्षण व २ गुण) याने संयमी खेळ करत संघाच्या मोठ्या विजयात भर घातली. तर गोव्याकडून रौश (१ मि. संरक्षण, २ गुण) याने चांगले प्रदर्शन केले.
पुरुष गट : हरियाणाची निर्णायक झेप
दुसऱ्या पुरुष सामन्यात हरयाणाने हिमाचल प्रदेशचा ३४–२४ असा १० गुणांनी पराभव केला. मध्यंतराला २ गुणांनी पिछाडीवर (१२–१४) असतानाही हरयाणाने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करत २२ गुणांची कमाई केली. हरयाणाकडून ध्रुव (१.४२ मि. संरक्षण, १० गुण) आणि गौरव (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी निर्णायक कामगिरी केली, तर हिमाचलकडून शिवम (२ मि. संरक्षण, ६ गुण) आणि ललित (१.२० मि. संरक्षण, ८ गुण) यांनी चांगला खेळ केला.
राजस्थानची विजयी घोडदौड : चंदिगडवर मात
पुरुष गटात राजस्थानने चंदिगडचा एक डाव ९ गुणांनी (२५–१६) पराभव केला. राजस्थानकडून मनिष (३.१० मि. संरक्षण, २ गुण) आणि हरिष (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तर चंदिगडसाठी दीपक सिंग (४ गुण) आणि संदीप कुमार (२.२० मि. संरक्षण) यांनी झुंज दिली.






















