पंढरपूर – गावाकडच्या जमीनी संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या केसचा सुमारे ७० वर्षांनी निकाल लागला. त्या प्रित्यर्थ भंगवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी पेशाने पोस्टमास्तर असलेल्या ५९ वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाने तामिळनाडू राज्यातील होसुर ( ता.सोलागिरी, जि.कृष्णागिरी ) येथून चक्क सायकलवरुन परिक्रमेस सुरुवात केली आहे. विश्वास बसणार नाही असा त्यांचा या वयात थक्क करणारा सायकल प्रवास आहे. कारण सोलगिरी या आपल्या गावापासून त्यांनी आपल्या परिक्रमेस सुरुवात केली असून ते रामेश्वरम येथे दर्शन घेवून रविवारी पंढरपूरात दाखल झाले. त्यांची परिक्रमा ऐवढ्यावरच थांबणार नसून पंढरपूरातून दुपारी परिक्रमेच्या शेवटच्या ठिकाण असलेल्या वाराणसीकडे ते चक्क सायकलवरुन रवाना झाले.
या ज्येष्ठ नागरिकाचे श्रीनिवासराव असे नाव असून तामिळनाडू राज्यातील होसूर (ता. सोलागिरी,जि.कृष्णागिरी ) गावचे ते रहिवासी आहेत. पेशाने ते पोस्टमास्तर असून त्यांचे (वय ५९ वर्षे ) इतके आहे. आजकालच्या तरुणांना धावण्याचा देखील सराव नाही मात्र श्रीनिवासराव हे ५९ वर्षांचे तरुण ज्येष्ठ नागरिक चक्क सायकलवरुन आपली परिक्रमा पुर्ण करीत आहेत.
दरम्यान परिक्रमे बद्दलचे कारण विचारले असता श्रीनिवासराव सांगतात की, १९५५ पासूनच्या होसूर येथील जागेच्या केसचा निकाल सुमारे ७० वर्षांनी २०२५ मध्ये लागला. त्याप्रित्यर्थ सोलागिरी ते रामेश्वरम ६०० किलोमीटर आणि रामेश्वरम ते पंढरपूर १ हजार ७०० किलोमीटर तसेच पंढरपूर ते वाराणसी १ हजार ४५० किलोमीटर अशा सायकलवरुन एकट्याने परिक्रमेचा निश्चय केला.
आपल्या निश्चय पुर्ततेसाठी २१ जानेवारी २०२६ सोलागिरी येथून रामेश्वरम कडे निघालो. २५ जानेवारी रोजी रामेश्वरम येथे पोहचलो. त्या ठिकाणी समुद्रस्नान, जगविख्यात रामेश्वर येथे भगवंताचे दर्शन करुन २६ जानेवारी २०२६ पंढरपूरच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाल्याची माहिती श्रीनिवासराव यांनी दिली.
पंढरपूर येथे रविवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान ते दाखल झाले. येथे पोहचल्यावर विठुरायाचे दर्शन करून आता ते नागपूर मार्गे वाराणसी येथे निघालेले आहेत. पंढरपूर येथे मंदिर समितीने त्यांचे दर्शन घडविले. ज्या ज्या ठिकाणी ते पोहोचतात, त्याठिकाणी पोस्टआँफीस मधून ते त्याठिकाणी पोहोचल्याचे प्रमाणपत्र लिहून घेतात. या प्रमाणेच रामेश्वरम येथील पोस्ट आॅफिसमधून त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे.
दरम्यान आज रविवार असल्याने पंढरपूर पोस्ट आॅफिस बंद होते म्हणून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक ओंकार जोशी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी नगरसेवक जोशी यांनी त्यांचे यथोचित स्वागत करुन आपल्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे पंढरपूरातून आता वाराणसीच्या प्रवासासाठी त्यांचे प्रस्थान झाले आहे. सुमारे १५ ते २० दिवसांनी वाराणसी येथे श्रीनिवासराव हे पोहोचतील असेही यावेळी त्यांनी दैनिक तरुणभारत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
———————–
चौकट : ( दिवसभराचा असा आहे दिनक्रम )
श्रीनिवासराव हे दररोज पहाटे चार ते साडेचार वाजता उठतात. पुजा, पाठ करुन पहाटे ते सायकल प्रवासास सुरुवात करतात. संध्याकाळी सहा वाजता कुठलेही गाव लागले तर त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. मुक्काम जे गाव लागेल त्या गावातील मंदिरात,धर्मशाळेत तर काही वेळेस ग्रामस्थांच्या घरातील अंगणात देखील मुक्काम करतात. लोक प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात. त्यानंतर पुढच्या प्रवासासासाठी ते मार्गस्थ होतात.
———————
चौकट : ( पांडुरंगाने तुमच्या मार्फत दर्शनाची व्यवस्था केली )
येथील ख्यातनाम संगीतकार विनोद शेंडगे यांच्या विठ्ठल मंदिरा जवळील घराजवळ श्रीनिवासराव यांनी स्वत:ची सायकल ठेवलेली होती. त्यामुळे शेंडगे यांना ते दिसले. शेंडगे यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली. तेंव्हा श्रीनिवासराव यांनी आपल्या परिक्रमे विषयीची माहिती शेंडगे यांना दिली. त्यानंतर शेंडगे यांनी त्यांच्या संदर्भातील माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला देखील कळविली. विठ्ठल मंदिरात दर्शन झाल्यावर श्रीनिवासराव म्हणाले की, चंद्रभागे मध्ये स्नान करताना विचार केला. आता पांडुरंगाचे दर्शन कोण करवून देणार. कारण सुट्यांमुळे दर्शनासाठी एवढी मोठी दर्शन रांग आहे. मग तुम्ही भेटला आणि पांडुरंगाने तुमच्या मार्फत दर्शनाची व्यवस्था केल्याचे सांगून श्रीनिवासराव यांनी आपले आभार मानल्याचे विनोद शेंडगें यांनी सांगितले.
——————-
चौकट : ( वाराणसी येथे श्रीनिवासरावांची मुक्कामाची झाली सोय )
ऐवढ्यावरच संगीतकार विनोद शेंडगे थांबले नाहीत. त्यांनी त्वरीत काशी येथील जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचेशी देखील संपर्क साधला. शिवाचार्य महाराजांना श्रीनिवासराव यांच्या परिक्रमे विषयी त्यांनी माहिती दिली. त्या नंतर शंकराचार्यांनी श्रीनिवासराव यांच्या १५ दिवसानंतर वाराणसी येथे पोहचल्या नंतर तेथील मुक्कामत सर्वतोपरी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे विनोद शेंडगे यांनी सांगितले.























