बार्शी – ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो, असे सांगून एका शेतकऱ्याची ६ लाख ५ हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोरगाव (खुर्द), ता. बार्शी येथील राजाभाऊ बाबु कांदे (वय ५२) यांनी गजानन विजय पवार (रा. भडकुंबा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) याच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी कांदे हे शेतीबरोबरच बबनराव शिंदे शुगर लिमिटेड, तुर्कपिंपरी या कारखान्यासाठी तीन वर्षांपासून ऊस वाहतूक ठेका धरतात. आरोपी गजानन पवार हा मागील दहा वर्षांपासून बोरगाव (खुर्द) येथे ऊसतोड मुकादम म्हणून येत असे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याच्याकडे ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याची मागणी केली होती.
११ मार्च २०२५ रोजी पवारने ‘माझ्याकडे मजूर आहेत, मी टोळी तयार करतो’ असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर १४ मार्च २०२५ रोजी तो बोरगाव (खुर्द) येथे येऊन कांदे व त्यांच्या साथीदारांसमोर प्रत्येकी एक लाख रुपये दराने १२ कोयत्यांचा करार ठरल्याचे सांगून एकूण १२ लाख रुपयांचा व्यवहार ठरवला. प्रारंभी ३.१० लाख रुपये (३० हजार फोनपे व २ लाख ८० हजार रोख) देण्यात आले. त्यानंतर पवारने कराराचे कागदपत्र व नोटरी आणून देतो, असे सांगत उर्वरित रक्कम मागितली. विश्वास ठेवल्याने कांदे यांनी २६ मार्च ते ३१ मे २०२५ या कालावधीत फोनपे व आरटीजीएसद्वारे २.९५ लाख रुपये पाठवले.
अशा प्रकारे एकूण ६ लाख ५ हजार रुपये ॲडव्हान्स दिल्यानंतरही पवारने ना मजूर दिले ना करार केला. याबाबत कांदे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर यांनी २१ जुलै रोजी वाशिम जिल्ह्यातील भडकुंबा येथे भेट देऊन चौकशी केली असता, पवारने ‘उद्या बँकेकडून चेक देतो’ असे सांगून त्यांना तीन दिवस थांबवले; मात्र शेवटी ना मजूर मिळाले, ना चेक. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजाभाऊ कांदे यांनी गजानन विजय पवार याच्याविरुद्ध विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. या घटनेमुळे ऊसतोडीच्या ठेक्यांमधील बेकायदेशीर करार व अविश्वसनीय दलालांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पुन्हा एकदा समोर आले आहे.















