पारध / जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या पारध बुद्रुक (Paradh Bk.) येथील जनता विद्यालय, पारध येथे नुकताच दीपावलीच्या निमित्ताने स्नेहमिलन व पालक मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. आजच्या युगात जिथे अनेक विनाअनुदानित शिक्षण संस्था अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून शिक्षणाचा बाजार मांडत आहेत, तिथे केवळ तुटपुंज्या शासकीय अनुदानावर बारावीपर्यंत निःशुल्क शिक्षण देणाऱ्या या १९५३ साली स्थापन झालेल्या ७० वर्षांहून अधिक जुन्या संस्थेने आपली निःस्वार्थ सेवा आणि मूल्याधारित शिक्षणाची परंपरा ठामपणे जपली आहे.
दिनांक २२: या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे, संस्थेची जुनी परंपरा आणि सद्यस्थितीतील ‘शिक्षणाच्या बाजारा’वर मान्यवरांनी केलेले प्रभावी भाष्य.
मोफत शिक्षणाचा डंका आणि पालकांशी थेट संवाद
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे यांनी केले. त्यांनी संस्थेची आर्थिक स्थिती स्पष्ट केली. “ही शाळा केवळ तुटपुंज्या अनुदानावर चालते. दुसऱ्या विनाअनुदानित शाळा भरमसाठ फी घेतात, पण आमच्या शाळेचा उद्देश विद्यार्थी घडवणे हा आहे.” पालकांनी थेट सूचना आणि मार्गदर्शन करावे यासाठीच या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
‘देखावा’ नव्हे, विद्यार्थ्यांची ‘वैयक्तिक काळजी’ महत्त्वाची!
प्रा. संग्राम देशमुख यांनी आपल्या भाषणात शिक्षणाच्या बाह्य स्वरूपावर परखड भाष्य केले. “आज परिसरात मोठे बिल्डिंग, स्कुलबस हा सर्व देखावा आहे; पण इथे सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक काळजी घेतली जाते. आम्ही विद्यार्थ्यांची तयारी करून घेतोच, पण पालकांनीही आपल्या मुलांचा अभ्यास बघितला पाहिजे व त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे.”
माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी संस्थेच्या योगदानाचे कौतुक केले. “या शाळेने आजवर शेकडो विद्यार्थी घडवले आहेत. इथे अनेक सवलती मिळतात. पालकांनी शिक्षकांशी वारंवार संवाद साधून सहकार्य करावे. मी एक पालक म्हणून संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘नो मोबाईल’चा सल्ला आणि पालकांकडून ‘क्लिअरन्स’
संस्थेचे सचिव उदयसिंह लोखंडे यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. “विद्यार्थ्यांसाठी पूर्ण स्टाफ आहे. प्रत्येक विषयासाठी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक आहेत, तसेच सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय उपलब्ध आहे.”
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पालकांना हात जोडून एक विनंती केली – “कृपया मुलांना मोबाईल देऊ नका!” मोबाईलमुळे अभ्यासात मोठा अडथळा येतो. मुलांनी अभ्यास सोडून मोबाईल पाहू नये. परीक्षा झाल्यावर दिला तर हरकत नाही. पालकांनी मुलांसाठी आणखी कोणत्या सूचना कराव्या, असे आवाहनही त्यांनी केले.
मेळाव्याच्या समारोपावेळी प्रा. संग्राम देशमुख यांनी पालकांना कोणत्याही सूचना किंवा तक्रारी विचारल्या असता, सर्व पालकांनी एकमुखाने कोणतीही तक्रार नसल्याचे सांगून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.
मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला माजी पंचायत सभापती परमेश्वर लोखंडे, माजी सरपंच गणेश लोखंडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, जनता विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद, संस्थेचे सचिव उदयसिंह लोखंडे, परिसरातील पत्रकार बांधव, तसेच मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या मोठ्या उपस्थितीमुळे ‘जनता विद्यालया’च्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती आली.



















