गेल्या काही दिवसांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच अनेक कलाकारांनी देखील सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डाचं कौतुक केलं आहे. आता अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
मराठी सिनेसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे हे अभिनयाबसोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. शरद पोंक्षे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कट्टर अनुयायी आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन शरद पोंक्षे व्याख्याने देत असतात. सोशल मीडियावर देखील पोंक्षे त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ शेअर करत असतात. आता रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासंदर्भात त्यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
काय आहे शरद पोंक्षे यांची पोस्ट?
आज ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा पाहिला. ८३ वर्षांचं आयुष्य ३ तासात दाखवायचं अत्यंत अवघड,पण हुड्डा यांनी ते छान दाखवलंय. विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज ह्या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतील व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हुड्डा ह्यांचे अभिनंदन.