शहरात आतापर्यंत डेंगीचे निश्चित निदान झालेल्या ५१ रुग्णांपैकी ३४ जण पुरुष असून, १७ महिला आहेत. पुरुषांमध्येही १५ ते २५ वर्षे वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेने डेंगीच्या ५१ रुग्णांचे लिंग आणि वय या आधारावर विश्लेषण केले आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.पावसाला सुरुवात होताच डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने रुग्णांच्या संख्येतही फार मोठी वाढ झाली नसल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. ताप, सर्दी, खोकल्याच्या तक्रारी घेऊन दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक दहापैकी दोन ते तीन रुग्ण डेंगी संशयित असतात. त्यांना डेंगीची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.
शहरात या वर्षी आतापर्यंत डेंगीचे ९२५ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २२८ रुग्ण एकट्या ऑगस्टमध्ये आढळले आहेत. त्यापैकी निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या १२ असल्याचेही विभागाने स्पष्ट केले. डासोत्पत्तीस कारणीभूत ठरलेल्यांना आता नोटीस बजावण्यात येत आहेत. वर्षभरात आतापर्यंत एक हजार ४७७ नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून एक लाख ८३ हजार ४०० रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले आहे. तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी एकात्मिक किटक व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे.