केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीला विरोध करीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या आंदोलनावेळी शेतकरी संघटनेने शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर जोरदार टीका केली. याचवेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यानी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. ते म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केला आहे. तो अतिशय अन्यायकारक निर्णय आहे. मागील आठ महिन्यांपासून शेतकरी कवडीमोल दरात कांदा विकत आहे. अद्यापही कांदा अनुदानही मिळाले नाही. अशा परिस्थितीत पुन्हा केंद्राने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.