संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केनियाचे कॅबिनेट संरक्षण सचिव एडन बेयर डुएल यांच्याशी चर्चा केली.ही बैठक अधिकाधिक दृढ होत असलेल्या भारत-केनिया संरक्षण सहकार्याची साक्ष होती. उभय देशांमधील संरक्षण संबंध अधिक प्रशिक्षण-केंद्रित असल्याने धोरणात्मक पैलूंचा समावेश करण्यासाठी विकसित झाले आहेत, यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली.
विशेषत: भारत आणि केनिया यांच्यातील संबंध बळकट होत आहेत. भारत आफ्रिकन देशांसोबतच्या संबंधांना खूप महत्त्व देतो हे यावेळी संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले. हिंद महासागर क्षेत्राच्या सागरी सुरक्षेसाठी दृढ सहकार्याच्या गरजेवर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली.
यावेळी उभय नेत्यांमध्ये क्षमता बांधणी आणि संरक्षण उद्योग आणि उपकरणांमधील सहकार्य यावरही चर्चा झाली. क्षमता बांधणीसाठी तसेच जहाज डिझाइन आणि बांधकामातील सहकार्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि केनिया शिपयार्ड लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
मैत्रीचे प्रतीक म्हणून, राजनाथ सिंह यांनी केनियाच्या सैन्याला वापरण्यासाठी ग्लायडर्स इंडिया लिमिटेडद्वारे निर्मित पॅराशूटच्या 15 जोड्या (मुख्य आणि राखीव) केनियाच्या संरक्षण कॅबिनेट सचिवांकडे सुपूर्द केल्या. केनियामध्ये अत्याधुनिक सीटी स्कॅन सुविधा उभारण्यासाठीही भारताने पाठिंबा दर्शवला आहे.
एडन बेरे ड्युएल यांनी खाजगी क्षेत्रासह भारतीय संरक्षण उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्याची प्रशंसा केली आणि केनियाच्या लष्कराच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा भारतीय उद्योग क्षेत्रांवर प्रकाश टाकला. सातत्य राखण्यासाठी आणि अशा कार्यक्रमांचा अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाच्या प्रशिक्षकांद्वारे केनियन सैन्याच्या ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ त्यांनी सुचवले.
घुसखोरी विरोधातील आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता क्षेत्रामध्ये संयुक्त प्रशिक्षणासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवण्यात आली. या बैठकीत परस्पर हिताच्या इतर प्रादेशिक सुरक्षा मुद्द्यांवरही चर्चा झाली.
केनियाचे कॅबिनेट संरक्षण सचिव 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आपल्या मुक्कामादरम्यान ते गोवा आणि बंगळुरू येथील इंडियन शिपयार्ड आणि संरक्षण उद्योगांना भेट देणार आहेत.