स्मार्टसिटीत एन्ट्री करतानाच वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (एनएचएआय) ताब्यात आहे, पण त्याची मालकी महापालिकेने घ्यावी, असे ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, रस्ता चकाचक करून द्या, आम्ही ताब्यात घेऊ, अशी भूमिका महापालिकेची आहे. दोघांच्या वादात या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
सोलापूर शहरात प्रवेश करणारा प्रमुख रस्ता तब्बल साडेसहा ते सात वर्षांपासून उखडलेला आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ड्रेनेज लाइनचे चेंबर रस्त्यापेक्षा उंच झाले आहेत. रस्ता दुभाजकाची दुरवस्था असून त्याठिकाणी नेहमीच मोकाट जनावरांचा वावर असतो. दुभाजकावर लावलेले एक झाड देखील शिल्लक नाही. दुभाजकावरील लोखंडी जाळी तुटलेली असून दुचाकीस्वारांनी दुभाजक तोडून त्यातून ये-जा सुरु केली आहे.