मोहोळ तालुक्यातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात मोहोळ पोलिसाला यश आले असून, त्याच्याकडून तब्बल २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राम उर्फ पीपी काळुराम भोसले (रा. पिटकेश्वर ता. इंदापूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशियताचे नाव आहे.
मोहोळ तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू होते. घरफोडी रोखण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, पोलिसांनी राम उर्फ पीपी काळुराम भोसले याला नरखेड येथुन पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता संजय नवनाथ काळे, अजय नवनाथ काळे (दोघे रा. सुर्डी ता. बार्शी) व चिरंजीव उर्फ खोडग्या हारकुन काळे (रा. भोयरे ता. मोहोळ) यांची नावे समोर आली असून पोलिसांच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे.पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेगडकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, अमोल घोळवे, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, अजित मिसाळ, संदीप सावंत, स्वप्नील कुबेर, सायबर सेलचे धीरज काकडे यांनी कारवाई केली.