जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असताना बार्शी, माढा व मोहोळ तालुक्यातील काही मंडलात अतिवृष्टी झाली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती ठिबक सिंचनाद्वारे वाचविलेली पिके अतिपावसाने वाया गेली आहेत. जिल्ह्यात काही गावात दुष्काळ तर काही ठिकाणी अचानक पाऊस अशी स्थिती निर्माण झाल्याने काही गावे मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे मदतीचे निकष गावनिहाय सर्व्हेवर ठरविणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कुठेही पाऊस नसताना मंगळवेढा-बोराळे या रस्त्यावर शनिवारी एका ठराविक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या पावसाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायल झाला होता. हा एका ठराविक परिसरातीलच पाऊस होता. तर रविवारी मोहोळ तालुक्यातील शेटफळ, बार्शी तालुक्यातील खांडवी, माढा तालुक्यातील माढा, कुर्डुवाडी, म्हैसगाव व दारफळ (सीना) या मंडलात २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे उर्वरित जिल्ह्यातील पिके पावसाअभावी वाया गेली आहेत.