जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्जचा आदेश देणारा जाहीर करा, संबंधित मंत्र्याने राजीनामा द्यावा, आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, यांसह करमाळ्यात मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अशा विविध मागण्यांसह जालना येथील लाठीचार्जचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा देत मुलींच्या हस्ते सरकारला बागंड्यांचा आहेर देण्यात आला.
पोथरे नाका येथून शांततेत मोर्चाला सुरुवात केली. मोर्चा तहसीलच्या दिशेने गेला. या मोर्चात जवळपास पाच ते सात हजार कार्यकर्ते सहभागी झाले. तहसील परिसरात राष्ट्रगीताने समारोप झाला. आज दिवसभर शहरातील सर्व पक्ष, संघटना, पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला पाठिंबा देत बंद पाळला होता. सायंकाळपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आयोजकांच्या वतीने नेटके नियोजन पाहायला मिळाले.