सुट्या निमिताने नाशिक मध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. धार्मिक तीर्थक्षेत्र अशी ओळख असणाऱ्या नाशिकची मंदिर गोदाघाट भाविक पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेत आहेत. एरव्ही धार्मिक विधी यासाठी येणारे भाविक श्रद्धेनं रामकुंडात डुबकी मारतात पण आज आनंदाची डुबकी बच्चे कम्पनीसह त्यांचे पालकही मारताना दिसले. नाताळ विकेंडलाच आल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला असून पर्यटन स्थळे गर्दीने फुलून गेले आहेत.. देव दर्शन घेऊन नववर्षाचे स्वागत करण्याचा अनेकांचा ध्यास असून त्र्यंबकेश्ववर, सप्तशृंगी, काळाराम, कपालेश्वर अशा सर्वच मंदिरात भाविकांची गर्दी दिसते आहे. येथूनच काही अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर, वणी-सापुतारा तसेच शिर्डी या पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ओढीमुळे पर्यटक नाशिकला वळत आहेत.
दरम्यान नाशिक ही मंदिराची नगरी असून यंदा गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे पर्यटनवाढीवर परिणाम झाल्याचे जाणवत होते. मात्र वर्षभरापासून हे सावंत दूर झाल्याने आता पर्यटक नाशिकमध्ये येत आहेत. सध्या नाशिकसह जिल्ह्यात गुलाबाई थंडी पडल्यामुळे आल्हाददायक वातावरण अनुभवायास मिळत आहे. त्यामुळे उशिरा सुरू झालेला पर्यटकांना आवडणारा थंडीचा मोसम आता चांगलाच बहरला आहे. नाशिक परिसरातील मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी फुल्ल गर्दी केली असल्यामुळे पर्यटकांनी शहर बहरले आहे. नाशिक शहरातील काळाराम मंदिर, रामकुंड परिसर, पंचवटी परीसर, तपोवन, पांडव लेणी त्याचबरोबर इतर खासगी पर्यटस्थळे मोठ्या प्रमाणावर असल्याने पर्यटकांचा वर्षभर राबता असतो.
त्याचबरोबर नाशिक शहराला लागूनच त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, सप्तशृंगी गड आदी महत्वाची पर्यटनस्थळे असल्याने नेहमीच गर्दी असते. त्यातच सध्याचा विकेंड असल्याने पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. काही दिवसांवरअसल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी देखील पर्यटक नाशिकला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पांडवलेणी, चामरलेणी, रामशेज, अंजनेरी, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर परिसर, दिंडोरी, चांदवड परिसरातील ऐतिहसिक किल्ले पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी फिरण्यासाठीही पर्यटक राजीखुशीने तयार होत असून, नांदूरमध्यमेश्वरला भेट देण्यासाठी पसंती देत आहेत. निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या व विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वास्तव्य असलेले नांदूरमध्यमेश्वर नेहमीच पर्यटक, दुर्गभ्रमंती करणारे, पक्षी प्रेमी आदींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.