राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोरील फलकात बदल दिसून आला. देशाचे नाव अंकित असलेल्या नामफलकावर ‘इंडिया’ऐवजी भारत असे नमूद करण्यात आले आहे. हा फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे.
भारताच्या यजमानपदात आयोजित जी-20 शिखर परिषदेच्या बैठकीला आज, शनिवारी नवी दिल्ली येथे सुरुवात झाली. या परिषदेच्या बैठकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो समाजमाध्यमात व्हायरल झालाय. या बैठकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या नेत्यापुढे त्यांच्या देशाचे नाव असलेला फलक ठेवण्यात आलाय. त्यात पंतप्रधान मोदींच्या समोरील फलकावर ‘इंडिया’ऐवजी भारत नमूद करण्यात आल्याचे दिसून आले. यापूर्वी झालेल्या जी-20 परिषदेत मोदींच्या नावापुढे ‘इंडिया’च लिहीले होते. परंतु, यावेळी भारत लिहीले आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून इंडिया नाव वगळून त्यात भारत असे नाव जाणीवपूर्वक लिहिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.