नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष एनआयए कोर्टाने सीआरपीसी 313 अंतर्गत सर्व आरोपींना 25 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनाही इतर आरोपींसह हजर राहावे लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंत 323 जणांची साक्ष नोंदवली आहे. तर 37 जणांनी आपली साक्ष मागे घेतली आहे. त्यांनंतर कोर्ट याप्रकरणातील आरोपींचे जबाब नोंदवणार होते. याप्रकरणी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देखील आरोपी आहेत. खासदार ठाकूर यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून जबाब नोंदवण्याची तारीख बदलण्याची विनंती केली होती, त्यानंतरच न्यायालयाने ही तारीख 25 सप्टेंबर निश्चित केली. ठाकूर यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, आगामी 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन चालणार आहे, त्यामुळे प्रज्ञा सिंह यांचा जबाब नोंदवण्याची तारीख विशेष अधिवेशनानंतरच ठेवावी. न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला आणि 25 सप्टेंबर रोजी त्यांचे म्हणणे नोंदवण्याची तारीख निश्चित केली.