राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडू आणि तेलंगणात 30 ठिकाणी छापे टाकलेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक एण्ड सिरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेच्या भरती प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
एनआयएची ही कारवाई तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये पसरलेल्या ISIS मॉड्यूलविरोधात सुरू आहे. तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये दहशत पसरवण्याच्या कटात आयएसआयएसच्या भूमिकेचा तपास करण्यासाठी एनआयएने नुकताच गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाची नोंद झाल्यानंतरच एनआयएने दोन्ही राज्यांतील 30 ठिकाणी छापे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या छाप्यांमधून इसीसशी संबंधित लोकांना पकडले जाणार आहे, ज्यांना दहशतवादी कारवाया करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. एनआयएने तामिळनाडूच्या कोईम्बटूरमध्ये 21 ठिकाणी, चेन्नईमध्ये 3 ठिकाणी, तर तेलंगणाच्या हैदराबाद आणि सायबराबादमध्ये 5 ठिकाणी आणि तेनकासीमध्ये एका ठिकाणी छापा टाकला. इसीस दहशतवादी संघटनेला भारतात पाय पसरण्यापासून रोखण्यासाठी एनआयए सातत्याने पावले उचलत आहे.