राज्य सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात राजापूर आणि कोल्हापूर यांना जोडणाऱ्या काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आराखडा तयार करून आता या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
जुलै २१ मध्ये कोकणात झालेल्या अतिवृष्टीमध्ये कुंभार्ली, आंबा, अणुस्कुरा घाटांत दरडी कोसळल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी कोकणाचे असलेले दळणवळण काही काळ बंद पडले होते. त्या पार्श्वभूमीवर कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला कोल्हापूरला जोडणारा एखादा भक्कम आणि तेवढाच महत्त्वपूर्ण घाट असणे किती गरजेचे आहे, हे अधोरेखित झाले होते. त्या दृष्टीने काजिर्डा घाटरस्त्याचा मुद्दा पुढे आला होता.
दरम्यान, अणुस्कुरा घाटाच्या खोदकामाला आरंभ झाला आणि काजिर्ड मार्गे घाटरस्त्याचे काम मागे पडले. नंतर अणुस्कुरा घाटासह गगनबावडा घाटाला महत्त्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाटमार्गाच्या हालचाली थंडावल्या. आता मात्र त्याला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे.
राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाट हा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. आता राजापूर तालुक्यातूनच काजिर्डा मार्गे आणखी एका नवीन मार्गाची भर पडणार आहे. भविष्यात या घाटाची पूर्तता होऊन हा मार्ग सुरू झाल्यास कोकणातून कोल्हापूरला जोडणारा आणखी एक नवा घाटमार्ग उपलब्ध होणार आहे.