भारतातील एक आघाडीची वॅकेशन ओनरशिप आणि लेजर हॉस्पिटॅलिटी कंपनी महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड (MHRIL) ने क्लब महिंद्रा या आपल्या प्रमुख ब्रॅंडच्या अंतर्गत उत्तराखंड सरकारबरोबर पुढील काही वर्षांमध्ये रु.१००० कोटी गुंतवणूक करण्यासंबंधी आणि तेथे चार ते पाच मोठे मार्की रिसॉर्ट बांधण्यासंदर्भात आज धोरणात्मक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. उत्तराखंड राज्याचे धोरणात्मक भागीदार बनण्याचे महिंद्रा हॉलिडेजचे उद्दिष्ट असून ते या रिसॉर्ट्सच्या विकासाच्या माध्यमातून उत्तराखंडमध्ये थेट रोजगाराच्या संधी निर्माण करुन राज्याला समृद्ध करण्यात राज्यसरकारला त्यांच्या पर्यटनविषयक सर्व प्रयत्नांमध्ये मदत करतील.
महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड (MHRIL) ची ही गुंतवणूक त्यांनी देशातील अन्य कोणत्याही राज्यात केलेल्या गुंतवणूकीपेक्षा सर्वात मोठी असून साल २०३० पर्यंत ५००० वरुन १०,००० पर्यंत विस्तार करण्याच्या कंपनीच्या महत्वाकांक्षी योजनेचा हा एक भाग आहे. हरिद्वार आणि चारधामसारखी धार्मिक स्थळे असोत किंवा राजाजी व कॉर्बेटसारख्या राष्ट्रीय उद्यानांमधील वन्यजीवन असो, औलीमधील स्किइंगचे पर्यटन असो किंवा ऋषिकेशमधील साहसी खेळांचे पर्यटन असो; ही गुंतवणूक देवभूमी उत्तराखंड व तेथील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे आणि तेथील अनोख्या अनुभवांना एक मानवंदना आहे. उत्तराखंडमध्ये देशातील वेगवेगळ्या वयाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी अतुलनीय अशी पर्यटनस्थळे आहेत आणि महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स (MHRIL) चे या भटकंतीच्या स्वर्गाचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही गुंतवणूक उत्तराखंडमधील कंपनीचा ठसा दुपटीहून जास्त वाढवेल. सध्या क्लब महिंद्राचे जिम कॉर्बेट, मसूरी, कनाटल आणि बिनसार येथे रिसॉर्ट आहे.
महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड (MHRIL) चे संपूर्ण जगभरात १४३ रिसॉर्ट्स असून त्यापैकी भारतात ८२ रिसॉर्ट्स आहेत. २,८६००० पेक्षा जास्त कुटूंब त्यांचे सदस्य असून त्यांनी याआधी केरळमधील मून्नार, राजस्थानमधील कुंभलगढ आणि उत्तराखंडमधील बिनसार यांसारख्या ठिकाणी सुट्टीसाठी खास पर्यंटन स्थळे तयार केली आहेत.
महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड (MHRIL) चे २०४० पर्यंत कार्बन तटस्थता साध्य करण्याचे ध्येय असून ते शाश्वत पद्धतींच्या वापरासाठी वचनबद्ध आहेत आणि त्यांच्या या ध्येयाचा एक भाग म्हणून उत्तराखंडमधील विकसित केले जाणारे सर्व नवीन रिसॉर्ट नेट झीरो ऊर्जा, जलसंवर्धन आणि कचरा व्यवस्थापन यामध्ये अग्रणी बनण्याचे लक्ष्य ठेवतील आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राज्यात शाश्वत पर्यटनासाठी एक आदर्श म्हणून समोर येतील.
महिंद्रा हॉलिडेज ही देशातील आदरातिथ्य सेवा क्षेत्रातील (हॉस्पिटॅलिटी) अशी पहिली संस्था आहे ज्यांनी अनुभवात्मक कौटुंबिक सुट्टी अशी कल्पक संकल्पना विकसित केली आणि या उद्योग क्षेत्रातील अनेकांना त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण करण्यास प्रेरित केले. तीन-चार पिढ्यांनी एकत्र येऊन व त्यांचे बंध पुन्हा नव्याने जागवून आयुष्यभरासाठी गोड व संस्मरणीय आठवणी बनवण्यासाठी आजी आजोबांपासून नातवंडांपर्यंत अनेक पिढ्यांसाठी एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेता येईल असे सुंदर वातावरण निर्माण करणारे म्हणून क्लब महिंद्रा प्रसिद्ध आहे.
महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड (MHRIL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कवींदर सिंग म्हणाले, “उत्तराखंड सरकारची पर्यटन उद्योगाविषयीची स्वप्नदृष्टी आणि दूरदर्शीपणा अद्वितीय आहे. उत्तराखंड सरकारचे उद्दिष्ट पर्यटकांसाठी अनुकूल असणाऱ्या व त्यांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या पायाभूत सुविधांसह पर्यटन स्थळे, सर्किट्स व क्लस्टर्स विकसित करणे आणि त्याच बरोबर कौशल्य विकास उपक्रमही राबवून आपल्या राज्यात एक उत्कृष्ट जागतिक दर्जाचे पर्यटन अनुभव देणे हे आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने दिलेला सक्रिय पाठिंबा, पर्यटनविषयक सशक्त व उत्तम धोरण आणि राज्यातील लोकांची आदरातिथ्याप्रती असलेली विशेष आपुलकी यामुळे प्रेरित होऊन आम्ही देशातील अन्य कोणत्याही राज्यात केलेल्या गुंतवणूकीपेक्षा सर्वात जास्त गुंतवणूक उत्तराखंड सरकारसोबत करीत आहोत.
आम्हाला उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात संधी दिसत आहेत. आमची ही विचारपूर्वक व नियोजित गुंतवणूक केवळ राज्याच्या क्षमतेवर आमचा असणारा विश्वासच दाखवत नाही तर त्यांच्या आर्थिक विकासासाठी योगदान देण्याची आमची कटिबद्धता देखील दर्शवते. याशिवाय, आमची ही गुंतवणूक आमच्या सातत्याने वाढत असलेल्या सदस्यांसाठी कायम स्मरणात राहिल असा सुट्टीतील आठवणींचा अमूल्य ठेवा व संस्मरणीय अनुभव निर्माण करत आहे. मी उत्तराखंड शासनाचे त्यांनी आम्हाला केलेल्या मदतीसाठी व दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”