गणपती उत्सवामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना एकाच छताखाली 351 गणपतीची स्थापना करून अख्ख्या घराला एखाद्या तीर्थस्थळासारखे स्वरूप आले आहे. अमरावती शहरातील श्रीकृष्ण पेठ परिसरात राहणारे व्यवसायिक राजेश खंडेलवाल यांच्या घरात गणरायाची विविध रूपं अतिशय थाटात देखाव्यांसह थाटली आहेत. गणरायावर असणारी ही आगळीवेगळी श्रद्धा गणपती उत्सवादरम्यान त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला भक्तिमय आनंद देणारी आहे.
प्रवेशद्वारापासूनच गणरायाचे दर्शन
खंडेलवाल कुटुंबाच्या वतीने आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोरच गणपती बाप्पाची सुंदरशी मूर्ती स्थापन केली आहे. सर्वांना आकर्षित करणाऱ्या ह्या अतिशय सुंदर मूर्तीचे दर्शन घेतल्यावर आतमध्ये प्रवेश करतात खालच्या दालनात गणरायाच्या विविध मूर्ती या गणपती बाप्पांच्या कथानकाप्रमाणे थाटण्यात आल्या आहेत. गणरायाची उत्पत्ती, गणपती बाप्पाचा विवाह सोहळा, गणरायांनी शंकर आणि पार्वती या आई-वडिलांना मारलेल्या प्रदक्षिणा अशा देखाव्यांसह गणपतीचे दर्शन खंडेलवाल यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला घडते.मयूर पंखात साकारला देखावा : पहिल्या मजल्यावर पायऱ्या चढताना देखील समोर गणरायाची सुंदर अशी मूर्ती डोळ्यात भरते. घराच्या मुख्य दारातून प्रवेश करताना देखील सुंदर अशा सुखकर्ताचे दर्शन घडते. संपूर्ण बैठक खोलीत जणू गणपती विश्व अवतरले असाच भास होतो. अगदी लहानशा दगडात कोरलेल्या विविध रंगी गणरायांसोबत वेगवेगळ्या आकारात आणि स्वरूपातील गणपतीच्या मूर्ती खंडेलवाल कुटुंबियांनी स्थापन केल्या आहेत. गणपती बाप्पांच्या मुख्यमूर्तीचा खास मयूर पंखात देखावा साकारण्यात आला आहे.
25 वर्षांची परंपरा
1998 मध्ये सुनिता राजेश अग्रवाल यांनी त्याच्या घरी एकूण 11 गणपतीची स्थापना केली होती. गणपती प्रति असणाऱ्या श्रद्धेतून गणपतीच्या 11 प्रकारच्या विविध मूर्तीची त्यांनी त्यावेळी छानशी सजावट करून स्थापन केल्या होत्या. त्यानंतर पुढे दरवर्षी त्यांनी 11 गणपती स्थापन करण्याची प्रथा सुरू ठेवली असतानाच हळूहळू या गणपतींची संख्या वाढायला लागली. मुलं मोठी व्हायला लागली तशी गणपती उत्सवात गणपतीचा देखावा देखील घरात छानसा सजायला लागला. आईने सुरू केलेली ही परंपरा मुलगा आणि सून यांनी देखील आवडीने जोपासली. दहाही दिवस घरी गणपतीचे भक्तिमय वातावरण राहात असल्याची माहिती सागर अग्रवाल यांनी दिली. तर प्रत्येक व्यक्तीसाठी गणरायाच्या दर्शनासाठी सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन खुले असल्याचे देखील सागर खंडेलवाल यांनी सांगितले.