राज्यात हत्येच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत. या घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. अशातच आता आणखी एक हादरवून टाकणारी हत्येची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तिहेरी हत्याकांडानं अहमदनगर जिल्हा हादरला आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली आहे.
शिर्डीजवळील सावळीविहीर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. यात एका व्यक्तीने आपली पत्नी, मेहुणा आणि आजे सासूची हत्या केली. धारदार शस्राने वार करत या व्यक्तीने तिघांची निर्घृण हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सासू, सासरे आणि मेहुणी यांच्यावरही हल्ला केला. यात हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर सध्या शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं असल्याचं समोर येत आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. सुरेश निकम असं आरोपी जावयाचं नाव आहे.
या घटनेत वर्षा सुरेश निकम, (आरोपीची पत्नी वय वर्षे 24), रोहित चांगदेव गायकवाड (आरोपीचा मेहुणा) वय वर्षे, 25, हिराबाई द्रौपद गायकवाड (आरोपीची आजे सासू) वय वर्षे 70 यांचा मृत्यू झाला आहे. तर, चांगदेव द्रोपद गायकवाड( आरोपीचे सासरे) वय वर्षे 55, संगीता चांगदेव गायकवाड (सासू) वय वर्षे 45 आणि योगिता महेंद्र जाधव (मेहुणी) वय वर्षे 30 हे गंभीर जखमी झाले आहेत