औरंगाबादच्या कचनेर येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्तीची अज्ञात चोरट्यांनी अदलाबदल केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या २४ तासांच्या आत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी दोघांना मध्यप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले आहे. कचनेर येथे असलेल्या श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात महिनाभरापूर्वीच दोन किलो वजनाची सोन्याची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती बसवण्यात आली होती.
मात्र अज्ञात व्यक्तींनी गाभा-यातून ही दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास करत, त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती बसविली. मूर्तीच्या पायाचा रंग पांढरा पडत असल्याने हा सर्व प्रकार समोर आला होता. त्यानंतर औरंगाबाद पोलिस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी दोन पथकांची नेमणूक करत तपासाच्या दृष्टीने इतर राज्यात रवाना करण्यात आले होते.