मागील दोन दिवस पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाल्याने उजनी धरणाचीपाणी पातळी झपाट्याने वाढत असून मागील २४ तासात १ टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरणाची टक्केवारीही २७ झाली आहे. तर एकूण जलसाठा ७८ टीएमसी एवढा झाला आहे. धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्गही कमी करून तो ३ हजार क्युसेक करण्यात आला आहे.
उजनी धरणाच्या वरील बाजूसस असलेल्या १९ पैकी ११ धरणे शंभर टक्के भरले आहेत तर ४ धरणे ९० टक्क्यांंच्या पुढे गेली आहेत. खडकवासला धरणही ८५ टक्के भरले आहे. त्यामुळे वरील पिंपळजोगे, वडज, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामाआसखेड, वडिवळे, आंध्रा व कासारसाई या १० धरणातून १०८०५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंडगार्डन येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होऊन तो ११०६१ क्युसेक तर दौंड येथून येणारा विसर्ग १८३४९ एवढा झाला आहे . तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.