घरी बसून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने एका तरुणाची सुमारे साडेअठरा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दिग्विजय सुधाकर कासार (वय 39, रा. गणेश चौक, सिडको, नाशिक) हे खासगी नोकरदार आहेत. दरम्यान, कासार हे चांगली नोकरी मिळविण्याचे, तसेच आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळविण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर शोध घेत होते. त्यादरम्यान, 8768082325 या व्हॉट्सअॅप क्रमांकधारकाने कासार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या अज्ञात आरोपींनी संगनमत करून कासार यांना घरी बसून, भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला भुलून कासार यांनी अज्ञात व्हॉट्सॲपधारकाने सांगितलेल्या येस बँक, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय या बँकांच्या खात्यांवर, तसेच यूपीआय, टेलिग्राम आयडीवर त्यांनी वेळोवेळी 18 लाख 53 हजार 632 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितली.
त्यानुसार फिर्यादी कासार यांनी ही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली. मात्र, बरेच दिवस उलटूनही जमा केलेल्या पैशांच्या मोबदल्यात नफा मिळाला नाही व मूळ रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे कासार यांनी संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार 18 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत घडला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कासार यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.