विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी नगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने २ ऑक्टोबरपासून नगर ते मंत्रालय (मुंबई) असा पायी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेतील १०० टक्के कर्मचारी सहकुटुंब सहभागी होणार असून त्यासाठी सर्वजण सामुहिक रजा टाकणार आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरपासून शहरात अग्निशमन, आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार असून इतर सर्व कामकाज बंद राहणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी दिली.
या वेळी सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, बाबासाहेब मुद्रल, विठ्ठल उमाप, बलराज गायकवाड, नंदकुमार नेमाणे, गुलाब गाडे, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, राहुल साबळे, अमोल लहारे, अकिल सय्यद आदी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष काँ. अनंत लोखंडे म्हणाले, गेल्या २७ दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनासह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींना नोटिस दिली होती. मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही. महापालिकेतील कामगारांच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्या तातडीने सोडविण्या संदर्भात या लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील इतर महा पालिकांच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी ही शासनाने निर्धारीत केलेल्या टक्केवारीपेक्षा कित्येक प्रमाणात जास्त असताना सदर महापालिकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी करण्यात येऊन सदर पोटीचे लाभ देण्यात आले.
मात्र नगर महापालिकेची केवळ आस्थापना लागू खर्चाची टक्केवारी ही शासन निर्धारीत टक्केवारी पेक्षा जादा असल्याचे कारण देऊन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचे लाभ कामगारांना शासना मार्फत नाकारण्यात आलेले आहेत. ते तातडीने लागू करावेत. लाड समितीच्या शिफारशीनुसार मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नेमणुका देण्यात याव्यात या प्रमुख २ मागण्यासह विविध प्रलंबित मागण्या या नोटिशीत देण्यात आलेल्या आहेत.मनपा कामगारांच्या या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आता हा लढा देण्यात येणार आहे. नगर ते मुंबई पायी लाँग मार्च २ ऑक्टोबरला नगर मधून कल्याण रोड मार्गे निघेल. यात सर्व कर्मचारी सहकुटुंब सहभागी होतील. १६ दिवसां चा पायी प्रवास करून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही.या आंदोलनासाठी कर्मचारी सामुहिक रजेवर जाणार आहेत. शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ अग्निशमन,आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार असून इतर सर्व कामकाज बंद राहणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी सांगितले.