त्या चौदा गावातील भंडार्ली डम्पिंग हटवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भंडार्ली डम्पिंग हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत डम्पिंग ग्राउंड बंद न केल्यास जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील यांनी २ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या विषयाचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्याना दिले आहे.
याबाबत जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील म्हणाले, संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा भंडार्ली येथे गेल्या वर्षभरापासून टाकण्यात येत आहे. मार्च २०२२ मध्ये त्यावेळचे पालकमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेमध्ये भंडार्ली डम्पिंग बाबत बैठक पार पडली होती. त्यावेळी मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील व माजी आमदार सुभाष भोईर आणि १४ गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा होवून ११ महिन्यासाठी भाडे तत्वावर ठाणे महापालिकेचा कचरा भंडार्ली डम्पिंगला टाकला जाईल असे सांगितले होते. त्यावेळी ११ महिन्यांचा करार संपल्यावर त्वरित भंडार्ली डम्पिंग बंद केला जाईल असे सांगितले होते. त्याची समाप्तीची तारीख फेब्रुवारी २०२३ मध्ये होती. त्यानंतर भंडार्ली डम्पिंग बंद होणे गरजेचे होते पण तसे होत नाही.
मनसे आमदार राजू पाटील व ग्रामस्थ यांची ठाणे महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून दोन महिन्याचा वेळ वाढून घेतला. त्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२३ रोजी डम्पिंग बंद होणे गरजेचे होते. भंडार्ली व संपूर्ण १४ गावातील नागरिकांचा भंडार्ली डम्पिंगला प्रथम पासूनच विरोध आहे. आता ३० सप्टेंबर २०२३ ही भंडार्ली डम्पिंग बंद करण्याची अंतिम तारीख देण्यात आली असून त्यापुढे एक दिवसही डम्पिंग वर कचरा टाकू दिला जाणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी. तसे झाल्यास एक जागरूक नागरिक म्हणून भंडार्ली डम्पिंग कायमस्वरूपी बंद करण्यासाठी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त लोकशाही मार्गाने भंडार्ली नाका येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिला आहे.
श्रेय घेण्यासाठी ठाकरे गटाची धडपड – लक्ष्मण पाटील
माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचा उपोषण इशारा म्हणजे फक्त ड्रामा आहे असे १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. २ ऑक्टोबरच्या पुर्वी भंडार्ली डम्पिंग ग्राउंड बंद होईल. फक्त येथील कचरा दुसऱ्या ठिकाणी टाकण्यासाठी आणि मशीन्स हलविण्यासाठी आठ – दहा दिवसांचा वेळ लागणार आहे. भंडार्ली डम्पिंग ग्राउंड संदर्भात यापूर्वी आंदोलनात झाले त्यावेळी रमेश पाटील हे सहभागी झाले नाहीत. आता काम पूर्ण झाल्यावर श्रेय घेण्यासाठी पाटील यांची धडपड सुरू आहे.