मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र, या प्रकरणाची सुनावणी आता महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात सदर सुनावणी थेट ३ नोव्हेंबर रोजी पार पडणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अस्वस्थता आणखीनच वाढणार आहे.
आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची गेल्या महिनाभरातील ही चौथी वेळ आहे. याआधी तीन वेळा या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही सुनावणी ३ ऑक्टोबर, मग ६ ऑक्टोबर आणि त्यानंतर आता ९ ऑक्टोबरला होणार होती. मात्र आता थेट ३ नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. मात्र, सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेत १६ आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मग ६ ऑक्टोबर, त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे ठरले होते. मात्र, आता ९ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तारखेला तरी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार की पुन्हा नवी तारीख मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीसाठी निश्चित केलेले वेळापत्रक
१३ तारखेला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही यावर सुनावणी, १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार, २० ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला देणार, २० ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्रे एखाद्या गटाला सादर करायची असतील तर त्यासाठी संधी दिली जाणार, २७ ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं मांडणार, ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपली बाजू मुद्देसूद मांडतील. त्यानंतर दावे आणि प्रतिदावे करतील, १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार, २० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाणार, २३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार आणि सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार.