बारामती येथील रेड बर्ड कंपनीचे विमान रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस अपघातग्रस्त झाले. व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर विमान होते. विमान एका शेतात अचानक कोसळले. दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते. आज पुन्हा दुसरा अपघात झाल्यानंतर वैमानिकांसह विमानतळानजिक असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
या अपघातात वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बारामतीत सुरु असलेल्या प्रशिक्षण संस्थेचा गेल्या काही दिवसातील हा पाचवा अपघात आहे. काही महिन्यांपूर्वी मेखळी येथे नीरा नदीच्या पुलाखालून विमान घालण्याच्या नादात अपघात झाला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये रुई बाबीर गावात अपघात झाला होता. 2022 मध्ये इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे तातडीचे लँडिग करावे लागले होते. दोनच दिवसांपूर्वी रेड बर्ड कंपनीच्याच विमानाचा विमानतळानजिक अपघात झाला होता.