तेलंगाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण राज्यभरात सुरु आहे. तेलंगाणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीकडून पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचवेळी काँग्रेसनं देखील सत्ता मिळवण्यासाठी जोरदार ताकद लावलेली आहे. तेलंगाणा विधानसभेच्या १२० जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचारावर भर दिला जात आहे. आज तेलंगाणातील भारत राष्ट्र समितीचे मेडक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला. मात्र, या घटनेतून ते बचावले आहेत.
तेलंगाणातील मेडक लोकसभा मतदार संघाचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांना पक्षानं दुब्बक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आज ते दौलताबाद मंडळातील सुरमपल्ली गावात प्रचारासाठी गेले होते. तिथं त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केला. सुरुवातीच्या प्राथमिक माहितीनुसार रेड्डी यांच्यात पोटात चाकू मारण्यात आला आहे.
कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोराला जमावानं जोरदार मारहाण केली आणि पोलिसांकडे सोपवलं. आरोपीची ओळख पटली असून तो चेप्पयाला विला येथील राजू असल्याचं समोर आलं आहे.
तेलंगाणा विधानसभेच्या १२० जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोगानं जाहीर केल्या होत्या. त्यापैकी सर्वात शेवटी तेलंगाणाची निवडणूक पार पडणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाणा आणि मिझोरममध्ये निवडणूक होत आहे. यापैकी सर्वात शेवटी मतदान तेलंगाणामध्ये होणार आहे. तेलंगाणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान पार पडल्यानंतर ३ डिसेंबरला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.
भारताच्या विजयात रोहित शर्माचा मास्टर स्ट्रोक काय ठरला, सामना कसा पालटला जाणून घ्या…
केसीआर तिसऱ्यांदा सत्ता मिळवणार का?
आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करत २०१४ मध्ये तेलंगाणा राज्याची स्थापना करण्यात आली. तेलंगाणा राज्य स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन निवडणुकांमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीनं सत्ता मिळवली होती. राष्ट्रीय राजकारणात पाऊल टाकण्याच्या निमित्तानं केसीआर यांनी पक्षाचं भारत राष्ट्र समिती असं केलं आहे. आता तेलंगाणात केसीआर तिसऱ्यांदा सत्तेत येणार की काँग्रेस सत्ता मिळवणार हे निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल.