उजनीतून शेतीला डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडताना जुनाट नादुरुस्त कालव्यांमुळे (कॅनॉल) प्रत्येक आवर्तनावेळी लाखो लिटर पाणी वाया जाते ही वस्तुस्थिती आहे. ५० वर्षांपूर्वीच्या जुनाट कालव्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ७०० कोटींची गरज आहे. परंतु, निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्वीचे प्रस्ताव बाजूला सारून आता ‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम’मधून २२५ कोटी मिळावेत, असा प्रस्ताव लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी सरकारला सादर केला आहे.
सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यातील अंदाजे दहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना उजनी जलाशयाचा लाभ झाला आहे. रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात उजनीमुळे दीड लाख हेक्टरवर ऊस असून त्यामुळे जिल्ह्यात ४३ साखर कारखाने उभारले आहेत. त्यातून हजारो हातांना रोजगारही मिळाला आहे. जून १९८०मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले.