ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काम करतायेत, त्याचप्रमाणे मी माझ्या जारकरवाडी गावामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांच्या विचाराने दोन उपसरपंच नेमत असल्याचं प्रसिद्धीपत्रक सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांनी काढलं आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याच राजकारणाचा आदर्श घेऊन आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच असावे, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी पत्रक देखील काढले होते. या मागणीचा विचार करून सरपंचांनी जारकरवाडी ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच नेमले आहेत.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, २३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत जारकरवाडीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीबाबत ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम २८(१) प्रमाणे नियम १९८४ मधील तरतुदीनुसार सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. मी ST प्रवर्गातील सरपंचपदी असल्याने आणि आमच्या गावच्या लोकसंखेच्या व गावच्या विस्ताराचा विचार करता ग्रामपंचायत जारकरवाडी करिता दोन उपसरपंचांची नेमणूक करण्याची सर्व परिस्थिती पाहता गरज वाटत आहे.
ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कार्यभार काम करतायेत. त्याचप्रमाणे मी माझ्या जारकरवाडी गावामध्ये माझ्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांच्या विचाराने कौसल्या संतोष भोजने (प्रभाग क्र.५) आणि सचिन बापू टाव्हरे (प्रभाग क्र.१) यांची उपसरपंच ग्रामपंचायत अधिनियम कलम २८(१) प्रमाण नियम १९६५ मधील तरतुदीनुसार उपसरपंच म्हणून सर्व सदस्यांच्या मताने सह्यानिशी माझ्या अध्यक्षतेखाली निवड करत आहे.
या निवडीने जसे राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत, त्याचप्रमाणे जारकरवाडीला देखील दोन उपसरपंचांची निवड करत असल्याचे सरपंच यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे इथून पुढे राज्यातील ग्रामपंचायतींना देखील दोन उपसरपंच लाभले जाणार याची चर्चा मात्र रंगली आहे. राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये देखील हा निर्णय व्हावा अशी मागणी देखील या ग्रामपंचायतीने केली आहे.