जवळपास दोन वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले इलॉन मस्क हे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत, ज्यांची 200 अब्ज डॉलर्सची संपत्ती बुडाली आहे. यापूर्वी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती बुडाली होती. आता इलॉन मस्क यांनी तो विक्रम मोडला आहे. इलॉन मस्क हे रॉकेटच्या गतीने प्रगती करत होते, मात्र ट्विटर घेण्याचा त्यांचा निर्णय त्यांना भारी पडला आहे. ट्विटरमुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. टेस्ला इंकचे सीईओ इलॉन मस्क हे इतिहासातील पहिले उद्योजक बनले आहेत, ज्यांची 200 अब्ज डॉलर्सची संपत्ती बुडाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्स मंगळवारी 11 टक्क्यांनी घसरले. त्यानंतर मस्क यांची लाखो डॉलर्सची संपत्ती गमावली. इलॉन मस्क आपल्या कंपन्यांकडून पगार घेत नाहीत, तर पगाराऐवजी कंपनीकडून शेअर्स घेतात. त्यामुळे त्याच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या, तर इलॉन मस्कची संपत्ती वाढते आणि शेअर्सचे भाव कमी झाले तर त्याची संपत्ती कमी होऊ लागते.
4 नोव्हेंबर 2021 रोजी इलॉन मस्क यांची संपत्ती 340 अब्ज डॉलर्स इतकी होती. त्यानंतर इलॉन मस्क यांनी फेब्रुवारी महिन्यापासून ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली. इलॉन मस्क यांनी ट्विटर 44 अब्ज डॉलर्सला विकत घेतले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, इलॉन मस्क यांची संपत्ती सध्या 137 अब्ज डॉलर्सवर आली आहे. इलॉन मस्क या महिन्यापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु या महिन्यात ते पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. फ्रेंच बिझनेस टायकून बर्नार्ड अर्नॉल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. दरम्यान, बर्नार्ड अरनॉल्टची संपत्ती वाढली असे नाही, उलट इलॉन मस्क यांची संपत्ती कमी झाल्यामुळे हे घडलं आहे.