भारतीय शेअर बाजाराने गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. रविवार, ३ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील निवडणुकीच्या निकालांनंतर स्टॉक मार्केटने सलग तीन दिवस नवनवीन उच्चांक नोंदवले आहेत. परंतु शेअर बाजारात पुढच्या घडीला काय होईल, हे सांगणे कठीण असते. त्यामुळे मार्केटच्या तेजीत काळजीपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून नंतर तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही. बाजारातील तेजीचे मंदीत कधी रूपांतर होईल हे सांगता येत नाही, अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यापूर्वी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजाराचे निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टीने उंच भरारी घेत विक्रमी वाटचाल सुरू ठेवली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा वाढत विश्वास या दोन गोष्टींच्या बळावर भारतीय शेअर बाजाराने सलग तीन दिवशी मोठी झेप घेतली. एकीकडे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स सत्तरीच्या जवळ पोहोचला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१ हजार आकड्याला स्पर्श करण्याच्या अगदी जवळ आहे. परंतु, लक्षात घ्या की शेअर बाजारातील व्यवहार अनिश्चित असतो आणि बाजारातील तेजी कधी खाली येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया तज्ञांनी दिलेल्या पाच महत्वाच्या गुंतवणुकीच्या टिप्स…
शेअर बाजारात सर्वत्र हिरवळ
देशांतर्गत बाजारात सध्या भरारी घेत असून यामागे अनेक कारणे आहेत. बाजारातील भावना सकारात्मक असून त्याला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. भारताचा जीडीपी जवळपास चार ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे, किंवा सोन्याच्या किमती आणि शेअर बाजारातील हिरवळ, आयपीओ बाजारातील तेजी आणि बीएसईच्या प्रमुख निर्देशांकाच्या मार्केट कॅपने उच्चांक पातळी गाठली, या सर्व अलीकडच्या घडामोडींनी बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि पुढेही तेजी कायम राहण्याची अपेक्षा आहे.
शेअर बाजाराच्या तेजीत काय करावे?
दरम्यान, बाजाराच्या तेजीतही गुंतवणूकदारांनी काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मार्केटमधील भावना सकारात्मक असूनही गुंतवणूकदारांनी सावधपणे गुंतवणूक करावी, जेणेकरुन बाजारात चालू असलेली तेजी कोणत्याही कारणाने कमी झाली किंवा पडझड सुरू झाली तर त्यांना कमीत कमी नुकसान सहन करावे लागेल किंवा तोटा होण्यापासून ते सुरक्षित राहतील.
बाजाराच्या तेजीत घ्यावयाची काळजी
– मार्केटच्या तेजीच्या काळात ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली पाहिजे. बाजार उच्चांकावर असला तरी विचारपूर्वक गुंतवणूक करा. थोडा वेळ घ्या, तपासा, चाचणी करा आणि नंतर योग्य ठिकाणी पैसे गुंतवा.
– बाजाराच्या तेजीच्या लाभ घेण्यासाठी जास्त कमाई करण्याच्या उद्देशाने पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी जोखीम तपासून घेणे महत्त्वाचे आहे. जितकी हवी तितकीच गुंतवणूक करा, जेणेकरून नुकसान झाल्यास तुमच्या नफ्यावर फारसा परिणाम होणार नाही. तज्ज्ञांच्या मते, मार्केटच्या तेजीमध्ये झालेल्या नफ्याचा आनंद लुटा आणि बाजारावर लक्ष ठेवून पुढील गुंतवणूक करा.
– शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते त्यामुळे कधी काय होईल याचा कोणीच अंदाज बंधू शकत नाही. त्यामुळे बुल मार्केटमध्ये पैसे कमावणारे किंवा नवीन गुंतवणूकदारांनी घसरणीच्या वेळी खरेदी करावी, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.
– मार्केट निर्देशकांनी अनेकदा जबरदस्त तेजीनंतर डुबकी घेतली आहे, परिणामी गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे. आगामी काळात बाजाराला कोणताही मोठा धक्का बसण्याची शक्यता कमी असली तरी, तरीही कोणाचे तरी ऐकून किंवा सोशल मीडियावर पाहून बाजारात पैसे गुंतवणे टाळा.
– एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी छोटी-छोटी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुम्ही गुंतवणुकीचा मार्ग बदलू शकता, जसे की SIP फॉर्ममध्ये गुंतवणूक करणे किंवा सोन्याची छोटी खरेदी करणे लाभदायक ठरू शकते.