आयकर विभागाने ओडिसा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला. या छाप्यात कंपनीच्या अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांनी धाड टाकली ज्यात मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे. आयकर विभागाने आतापर्यंत ओडिसाच्या बोलांगीर, संबलपूर आणि झारखंडच्या रांची, लोहरदगा येथे छापे टाकले. आयटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत एकूण ५० कोटी रुपयांची रक्कम अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. ज्या ठिकाणी हे छापे टाकले तेथे नोटांची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणात होती की, नोटांची मोजणी करणारे मशीन बंद पडले.
छाप्यात सापडलेली रक्कम इतकी मोठी आहे की बुधवारी सकाळपर्यंत याची मोजणी सुरू होती आणि त्याची एकूण रक्कम ५० कोटींच्या पुढे गेली होती. विशेष म्हणजे आयकर विभागाचा हा छापा अद्याप संपलेला नाही. अधिकारी आता बौध डिस्टिलरीजच्या अन्य ठिकाणी छापे टाकत आहेत.
बौध डिस्टिलरीजसह आयकर विभागाने झारखंडमधील एक प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र रुंगटा यांच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत. रुंगटा यांच्या रामगड, रांची आणि अन्य ठिकाणी तसेच घरांवर आयकर विभागाने सकाळपासून छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई सुरू असताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे.
 
	    	 
                                

















 
                