सांगली जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त लाचखोर शिक्षण अधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडे तब्बल ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांना आणि त्यांच्या पत्नीच्या चौकशीमध्ये विसंगती आढळल्याने दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू मारुती कांबळे (वय ५९) आणि त्यांची पत्नी जयश्री विष्णू कांबळे (दोघे रा. बारशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्यासाठी तिघा शिक्षकांनी तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी ६० हजार रुपयेप्रमाणे लाच मागणी केली. याबाबतची तिघांनी २६ एप्रिल रोजी सांगलीच्या लाचलुचपत कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ एप्रिल २०२२, २ मे २०२२ आणि ०६ मे २०२२ रोजी पडताळणी केली असता त्यामध्ये शिक्षण अधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्राकडे प्रत्येकी ६० हजारप्रमाणे १ लाख ८० हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती १ लाख ७० हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कांबळे आणि सोनवणे यांच्या सांगलीतील राहत्या घराजवळ सापळा लावला असता विजयकुमार सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून १ लाख ७० हजार रूपये लाच स्विकारली तसेच सोनवणे यांनी सदरची लाच विष्णू कांबळे यांना दिल्यानंतर कांबळे व सोनवणे यांना कांबळे यांच्या राहत्या घरी रक्कमसहीत रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी लाच लुचपत विभागाकडून कसून चौकशी सुरु होती. विष्णू कांबळे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे १० लाखांची रोकड मिळाली होती. या रकमेबाबत त्यांनी समाधानकारक खुलासा दिला नव्हता. त्यामुळे त्यांची उघड चौकशी करण्यात येत होती. सदर चौकशीमध्ये निवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांनी १९८६ ते ६ मे २०२२ या कालावधीत संपादित केलेली मालमत्ता त्यांच्या ज्ञात स्त्रोताच्या प्रमाणाशी विसंगती असल्याने विष्णू कांबळे यांनी ८२ लाख ९९ हजार ९५२ इतकी संपत्ती भ्रष्ट मार्गाने कमावल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये त्यांची पत्नी जयश्री कांबळे यांनी त्यांना अपप्रेरणा दिली असल्याने दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांनी केली.