आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपची सत्ता येईल. मोदी पंतप्रधान होतील. पण त्यानंतर ते राष्ट्रपती होतील आणि शहांकडे पंतप्रधानपद जाईल, असं भाकित शेतकरी नेत्यानं केलं आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. देशात पुन्हा भाजप सरकार येईल. पण खुर्चीवर नवा चेहरा दिसू शकतो, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आश्चर्यजनक भाकितं केली आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच सत्तेत राहील. सुरुवातीला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. पण ते मध्येच पदावरुन पायउतार होतील आणि राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांच्या जागी अमित शहा पंतप्रधान होतील. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केंद्रात गृहमंत्री होतील. ते शहांची जागा घेतील, असं भाकित टिकेत यांनी केलं. शेतकरी नेते असलेल्या टिकेत यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे केंद्र सरकार अडचणीत आलं. हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. अखेर सरकारला कृषी कायदे रद्द करावे लागले.
नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका झाल्या. त्यातील तीन राज्यांमध्ये भाजपनं बाजी मारली. या तिन्ही राज्यांत भाजपनं काँग्रेसला शह दिला. या निकालावरही टिकेत यांनी भाष्य केलं. सगळे एकत्र आले नाही तर मारले जातील, असं टिकते म्हणाले. यावेळी त्यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीनं ओवेसी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ओवेसींचा उल्लेख हैदराबादी असा करत त्यांना बडी बिमारी म्हटलं. बी टीम होती आणि सी टीमदेखील आली असं म्हणत त्यांनी ओवेसींना लक्ष्य केलं.