मुंबई: महिला आयपीएल अर्थात WPLच्या २०२४च्या हंगामासाठी लिलावाला सुरूवात झाली आहे. या लिलावात एकूण १६५ खेळाडू सहभागी झाल्या आहेत. WPLच्या या मिनी लिलावात १०४ भारतीय तर ६१ परदेशी खेळाडू आहेत. लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर मोठी बोली लावली जात आहे. पण एका भारतीय खेळाडूंवर लावण्यात आलेल्या बोलीने सर्वांना चकित केले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणारी सलामीवीर फलंदाज वृंदा दिनेशला संघात घेण्यासाठी ३ संघात मोठी चुरस पाहायला मिळाली. वृंदाला संघात घेण्यासाठी आरसीबी आणि युपी वॉरियर्समध्ये स्पर्धा सुरू होती. अखेर १० लाख रुपये बेस प्राइस असलेल्या वृंदासाठी युपी वॉरियर्सने १.३० कोटी इतकी रक्कम मोजून आपल्याकडे घेतले. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये ही सर्वोच्च बोली ठरली. २३ वर्षीय वृंदाने १७ टी-२० सामन्यात १२६.१०च्या स्ट्राइक रेटने ३५७ धावा केल्या आहेत.
महिला प्रीमिअर लीगचा हा दुसरा हंगाम आहे. स्पर्धेतील ५ संघाकडे ३० खेळाडू घेता येतील. यातील ९ खेळाडू परदेशी असतील. वृंदा प्रमाणेच जलद गोलंदाज आणि ऑलराउंडर काशवी गौतमवर देखील मोठी बोली लावली. १० लाख बेस प्राईस असलेल्या काशवीला गुजरात जायंट्सने २ कोटी इतकी बोली लागली.