भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर ३ वर्षांनी बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. धोनीनं त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७ नंबरची जर्सी परिधान केली. ती जर्सी रिटायर करण्याचा घेण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.
धोनीची जर्सी रिटायर करण्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. याआधी असा सन्मान केवळ सचिन तेंडुलकरला मिळाला आहे. सचिननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कायम १० क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. ती रिटायर करण्याचा निर्णय बीसीसीआयनं २०१७ मध्ये घेतला होता. धोनीच्या ७ क्रमांकाची प्रतिष्ठित जर्सी आता अन्य कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला परिधान करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीनं दिलेल्या योगदानाबद्दल त्याचा जर्सी नंबर रिटायर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा जिंकली. धोनीनं १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यानं २०१४ मध्येच कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता.
बीसीसीआयनं टीम इंडियाच्या खेळाडूंना, विशेषत: पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना याबद्दलची माहिती दिली आहे. तेंडुलकर आणि धोनीशी संबंधित जर्सीचे क्रमांक निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे नाही, असं बीसीसीआयनं खेळाडूंना कळवलं आहे. धोनीचा जर्सी नंबर ७ निवडू नका, अशी सूचना नव्या खेळाडूंना देण्यात आल्याचं बीसीसीआयशी संबंधित अधिकाऱ्यानं दिली.