आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कामाला लागले असून,आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. तर या सभेसाठी भाजपकडून शहरातील चौकाचौकात होर्डिंग लावण्यात आले आहे. मात्र हायकोर्टासमोरील चौकात लावलेले होर्डिंग बंजारा ब्रिगेडकडून फाडण्यात आले आहेत. संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर होर्डिंग लावण्यात आल्याने ते फाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावरून सभेआधीच राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. तर संध्याकाळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सभास्थळी आणि शहरातील चौकाचौकात यासाठी होर्डिंग लावण्यात आले आहेत. दरम्यान याचवेळी हायकोर्टासमोरील संत सेवालाल महाराज चौकात देखील होर्डिंग लावण्यात आले होते. ज्यात काही होर्डिंग संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर लावण्यात आले होते. त्यामुळे बंजारा ब्रिगेडच्या वतीने हे होर्डिंग फाडण्यात आले आहे. तर संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर हे होर्डिंग लावल्यानेच फाडण्यात आल्याचा दावा बंजारा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.
जे पी नड्डा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभास्थळ आणि परिसरातील रस्त्यांवर आणि चौकात भाजपचे झेंडे पाहायला मिळत आहे. तर ठिकठिकाणी स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे नड्डा यांच्यासभेच्या नियोजनासाठी केंद्रीय आणि राज्यातील भाजपचे मंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आता नड्डा यांच्या सभेला किती गर्दी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. महानगरपालिका देखील सतत शिवसेनेच्या ताब्यात असल्याचे पाहायला मिळाले आहे. 2019 सोडलं तर लोकसभा देखील सेनेच्याच ताब्यात होते. त्यामुळे आता औरंगाबादमधील शिवसेनेचा गड भेदण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असून, त्याचीच ही सुरवात असल्याची देखील चर्चा आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद लोकसभा निवडणूक देखील यंदा भाजप लढवणार असल्याचं विधान भाजप नेत्यांनी केले आहे.