गावातील राजकारण आणि जमिनीचा वाद यातून कायमच खटके उडत असतात. वाद किरकोळ असतात नंतर वाद विकोपाला जाऊन खूनही होतात,काहीसा असाच प्रकार लातूर जिल्ह्यातील होळी या गावात झाला आहे. नमस्कार का घातला? या कारणामुळे चक्क हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे लातूरात खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा तपास करत आहे. सकाळी नमस्कार का घातला? यावरूनही वाद उफाळून आला होता
होळी या गावातील महादेव उर्फ मुन्ना केरबा यादव आणि त्यांचा लहान भाऊ संभाजी केरबा यादव सकाळी घरासमोर बसले असताना गावातील काही तरुणांनी नमस्कार घातला होता. यावरून वाद वाढला आणि विकोपाला गेला. सकाळी शाब्दिक बाचाबाची झाली होती. यादव बंधूचे प्रकाश जाधव यांच्यासोबत शिव रस्त्यावरून वाद सुरू होते. त्यातच सकाळी नमस्कार का घातला यावरूनही वाद उफाळून आला होता. रात्री दहा वाजताच्या सुमारास यादव बंधू यांनी सकाळच्या घटनेचा जाब विचारण्यासाठी प्रकाश जाधव यांच्या घराकडे गेले. त्यावेळी प्रकाश जाधव यांच्या सह तीन ते चार जणांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार सुरू केले. या जबर हल्ल्यात महादेव उर्फ मुन्ना याचा जागीच मृत्यू झाला असून लहान बंधू संभाजी गंभीर जखमी झाला आहे. महादेव यादव याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे अनेक वार आहेत.
होळी हे गाव दोन हजार लोकसंख्येचा आहे. गावात आज गोंधळाचा कार्यक्रम होता. गोंधळाच्या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष होतं. याच वेळी यादव बंधू हे प्रकाश जाधव यांच्या घराकडे गेले होते. महादेव उर्फ मुन्ना यादव हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसापासून गावातील शिव रस्त्यासाठी तो प्रयत्न करत होता. यातूनच गावातील काही लोकांबरोबर त्याचे वाद सुरू होते. सकाळच्या घटनेनंतर वाद विकोपाला गेले आणि खुनासारखी घटना घडली आहे.
होळीसारख्या गावामध्ये दोन बंधूवर प्राणघातक हल्ला होऊन एकाचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांना कळाली. औसा पोलीस ठाण्याचे पीआय त्याचबरोबर किल्लारी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक अशे तीन पथके गावात दाखल झाले आहेत. जखमी संभाजी यादव यास तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचनाम्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती गावात कळाल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी प्रकाश जाधव आणि इतर तीन ते चार जणांची माहिती पोलिसांनी घेतली आहे.हे सर्व आरोपी फरार झाले आहेत. पोलिसाची तीन पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.
मध्यरात्रीनंतर मृत महादेव उर्फ मुन्ना यादव याचा मृतदेह हासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. जखमी संभाजी यादव यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाजीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.