ज्या प्राणी व पक्षांच्या प्रजाती लुप्त होत आहेत, त्या सर्वांचेच संवर्धन आवश्यक असल्याने अशा प्रत्येक प्रजातींसाठी संवर्धन व प्रजनन केंद्रे निर्माण करण्याचे शासनाने ठरवले आहे, असे प्रतिपादन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. वृक्षसृष्टी आहे म्हणून जीवसृष्टी आहे आणि या दोन्हींचे संवर्धन मानवाच्या सुरक्षित भवितव्यासाठी आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
विविध निसर्ग सेवक संस्था आणि संघटनांनी एकत्र येत जटायू संवर्धनात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार येथील कुसुमाग्रज स्मारकात आयोजित केला होता, त्याप्रसंगी सुधीर मुनगंटीवार हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की रामायणातील सर्वात महत्वाचे प्रसंग नाशकात घडले आहेत. प्रभु रामचंद्र आणि नाशिक यांचे जटायूशी एक विशेष नाते आहे. कधी काळी लाखोंच्या संख्येने असलेले हे पक्षी आज केवळ काही हजार उरले आहेत. त्यामुळे जटायू संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवशक झाले आहे. आपण सर्वांनी मिळून हा गोवर्धन उचलला तर आपण निश्चितपणे जिंकूच असा मला विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यावेळी पुढे म्हणाले की प्रमोदजी महाजन नेहमी सांगत की, समुद्राचा खारटपणा कमी झाला नाही तरी नदी आपले पाणी समुद्रात अर्पण करण्याचे काम कधीच बंद करत नाही, तसेच निसर्ग संवर्धक कार्यकर्त्यांनी आपले कार्य थांबवू नये, आज निसर्गाला आपली सर्वाधिक गरज आहे, असे ते म्हणाले. सर्व निसर्ग सेवकांनी एकत्र समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. शासनाचे काम जरी प्रामाणिकपणे चालले असले तरी शासकीय कामांनी गती देण्यात आणि अधिक गतीने कामे पूर्ण करण्यासाठी गैरशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) कार्याची व पाठपुराव्याची आवश्यकता असते.
यावेळी सुधीर मुनगंटीवार असेही म्हणाले की, संपूर्ण विश्वात पृथ्वी हा एकमेव जीवंत ग्रह आहे (जीवसृष्टी असलेला). त्यामुळे पृथ्वीचे पर्यावरण आणि निसर्ग सांभाळण्याची मोठी जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे. एकदा ही जबाबदारी स्वीकारली की त्या विपरित काहीही मनात येता कामा नये.
याप्रसंगी जटायू संवर्धनासाठी प्रभावी कार्य करणाऱ्या श्री. देवचंद महाले पाटील, श्रीमती देवीजी महाले, श्रीमती जुईताई पेठे, डॉ. अनिल माळी, श्री. मधुकर जगताप, श्री. दत्ताकाका उगांवकर, श्री. सतीश गोगटे, श्री. विनोद पाटील, श्रीमती प्रतिक्षा कोठुळे, श्री. रवी वामनाचार्य, श्री. संदीप भानोसे, श्री. अनंत सरोदे, श्री. मिलिंद सावळे, श्री. चंद्रशेखर कुलकर्णी, मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक श्री संतोष जाधव आदी मान्यवर कार्यकर्त्यांचा आणि इको एको संस्था, पक्षीमित्र संघटना महाराष्ट्र, वन विभाग पश्चिम नाशिक आदी संस्थांचा मंत्रीमहोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर आमदार श्री देवयानी फरांदे, मुख्य वनसंरक्षक श्री. ऋषिकेश रंजन, उपवनसंरक्षक श्री. पंकज गर्ग, श्री. दत्ताजी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या २३ संस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता.