विठ्ठल भक्तांसह रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर असून सातारा, सांगली आणि मिरजकरांना मुंबईला आणि पंढरपूरसाठी थेट साताऱ्यातून गाडी उपलब्ध करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून दादर-पंढरपूर गाडीचा व्हाया मिरज मार्गे सातारापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेनं २५ जानेवारी रोजी एक्स्प्रेसच्या विस्ताराबाबत अधिसूचना जारी केली आहे. मध्य रेल्वेनं लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या दादर-पंढरपूर एक्सप्रेस ट्रेन दर रविवार, सोमवार व शुक्रवारी धावते आणि दादर ते पंढरपूरदरम्यान नऊ रेल्वे स्थानकांवर थांबते. नवीन अधिसूचनेनुसार या गाडीला सांगली जिल्ह्यातील जत, धालगाव, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, मसूर, कऱ्हाड, कराड आणि सातारा येथे थांबे देण्यात येणार आहेत. या शिवाय मिरज-पंढरपूर मार्गावरील कवठेमहांकाळ-ढालगाव, जत रोड, सांगोला या प्रमुख तालुक्यातील रेल्वे प्रवासी मुंबईशी जोडले जाणार आहेत. ही गाडी सातारा येथून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. पंढरपूर येथे रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. मुंबई येथील दादर येथे सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
नवीन अधिसूचनेनुसार दादर-पंढरपूर एक्सप्रेस गाडीस सातारा, कोरेगाव, मसूर, कऱ्हाड, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, केम, जेऊर, भिगवण, दौंड, केडगाव, उरुळी, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादर असे थांबे राहणार आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना दिलासा
दादर- पंढरपूर एक्स्प्रेसचा मिरज मार्गे साताऱ्यापर्यंत विस्तार करण्यात आल्यानं सातारा आणि सांगलीतील वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या गाडीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सातारा रेल्वे कृती समितीचे सदस्य ॲड. विनीत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या विस्तारामुळे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. कर्नाटकातून येणारे भाविक मिरजमार्गे पंढरपूरला जाऊ शकतात. विशेषत: आषाढी व कार्तिकी एकादशीवेळी विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारकरी भाविक भक्तांना या रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.