जिल्ह्यातील एकाच परिवारातील ८६ सदस्यांना कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकरे कुटुंबातील सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. लऊळ (ता. माढा) येथील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
लोकरे कुटुंबाची कागदपत्रे तपासताना १८५९ मधील दस्तऐवजावर त्यांची कुणबी नोंद आढळली होती. त्यानंतर लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी प्रमाणपत्रासाठी सातत्याने पाठपुरावा करून तहसील कार्यालयातून कुटुंबातील सर्वांचेच कुणबी प्रमाणपत्र काढून घेतली. त्या सदस्यांचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाइकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.