वाराणसीतील ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूज सुरूच राहणार आहे. या पूजेला विरोध करणारी मुस्लीम पक्षाची आव्हान याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. व्यास तळघरात पूजा सुरूच राहणार असले न्या. रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकलपीठाने स्पष्ट केलेय.
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने गेल्या 31 जानेवारी 2024 रोजी ज्ञानवापीच्या व्यास तळघरात हिंदू धर्मीयांना पूजा करण्याची परवानगी दिली होती, त्यानंतर वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन व्यवस्था मशीद समितीच्यावतीने आव्हान देण्यात आले होते. हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. उच्च न्यायालयाने यासंदर्भात सुनावणी घेत, मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळत असल्याचे सांगत व्यास तळघरातील पूजा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी, वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली. जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयानंतर लगेचच ज्ञानवापी व्यास तळघरात पूजा सुरू करण्यात आली. तसेच तिथे देवतांची स्थापना करून आरत्यांचे वेळापत्रक लागू करण्यात आले. लाखो भाविकांनी याचे दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय दिवसातून 5 वेळा आरतीही केली जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पहिली पूजा केली होती.