राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेतून ओबीसी, एसबीसीसह आता व्हीजेएनटी प्रवर्गातील बेघर लाभार्थींनाही घरे मिळणार आहेत. व्हीजेएनटीचे जिल्ह्यात ३१ हजार लाभार्थी बेघर आहेत. पहिल्यांदा ओबीसीतील ११ हजार बेघर लाभार्थींना बांधकामासाठी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. घरकुलासाठी टप्प्याटप्याने एकूण एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळते. स्वच्छतागृहासाठी १२ हजार रुपये आणि ‘मनरेगा’अंतर्गत मजुरीपोटी २३ हजार २०० रुपये स्वतंत्रपणे दिले जातात.
सोलापूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेअंतर्गत २०२३-२४ ते २०२६-२७ या तीन वर्षांत ६२ हजार २१८ ओबीसी लाभार्थींना हक्काचा निवारा मिळणार आहे. आता राज्य सरकारने मोदी आवास योजनेत व्हीजेएनटी प्रवर्गातील बेघर लाभार्थींचाही समावेश केला आहे. जिल्ह्यातील अंदाजे ३१ हजार व्हीजेएनटी कुटुंबांना राहण्यासाठी स्वत:चे घर नाही. ‘व्हीजेएनटी’अंतर्गत धनगर, वंजारी, वडार, लमाण अशा एकूण १४ जातीतील बेघर लाभार्थींना पुढील आर्थिक वर्षात घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. तुर्तास जिल्ह्यातील ११ हजार ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील लाभार्थींना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता सोमवार ते गुरुवारपर्यंत मिळणार आहे.