लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात माढा व सोलापूर हे दोन मतदारसंघ आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मागील दोन्ही निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाले. पण, २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीवेळी जिल्ह्यातील साडेबारा ते १३ लाख मतदारांनी मतदानच केले नाही. त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व शहर उत्तर येथील मतदार सर्वाधिक आहेत. आता आगामी निवडणुकीत कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, या समिकरणाची जुळवाजुळव सुरु झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघासाठी तीन हजार ५९९ मतदान केंद्रे असून मागील निवडणुकीत तब्बल २७४ केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. त्यात शहर उत्तर दहा, शहर मध्य ७१, अक्कलकोट ५४, दक्षिण सोलापूर ६८ व पंढरपूरमधील २६ केंद्रे आहेत.
विशेष म्हणजे हे विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यावरच काँग्रेस उमेदवाराला विजय शक्य आहे. दोन्ही निवडणुकीत दीड-पावणेदोन लाख मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. पण, आता काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांना बूथ यंत्रणा सक्षम करून मतदानाची टक्केवारी वाढवावीच लागेल. जिल्ह्यातून स्थलांतर झालेले मतदार, मतदानादिवशी फिरायला गावी जाणारे मतदार, मतदानाला न येणारे मतदार, यांच्यावर उमेदवारांना लक्ष ठेवावे लागणार आहे. त्याशिवाय विजयाचे समीकरण तंतोतंत जुळणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.