रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोठी घोषणा केली. पुतीन यांनी युक्रेनसोबत 36 तासांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली. पुतीन यांनी हा निर्णय ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या निमित्ताने घेतला आहे. ही शस्त्रसंधी 6 आणि 7 जानेवारी दरम्यान असणार आहे.
पुतीन यांना रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांनी याबाबत आवाहन केले होते. पुतीन यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ऑर्थोडॉक्स ख्रिसमस दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा केली. मात्र, पुतीन यांची घोषणा फसवी असून धोका देणारी असल्याचे युक्रेनने म्हटले.
रशियन राष्ट्रपतींच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती पुतीन यांनी 36 तासांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. ही तात्पुरती शस्त्रसंधी 6 जानेवारी रोजी स्थानिक वेळ दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. रशिया आणि युक्रेनमधील अनेक परंपरावादी ख्रिश्चन समुदाय 6-7 जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा करतात.
काही दिवसांपूर्वीच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व डोनेस्तक भागात युक्रेनच्या रॉकेट हल्ल्यात 63 रशियन सैनिक मारले गेले. हा रॉकेट हल्ला रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक भागात झाला होता. या ठिकाणी रशियन सैनिक तैनात होते. हिमर्स प्रक्षेपण प्रणालीसह सहा रॉकेटचा मारा युक्रेनने केला होता. त्यापैकी दोन रॉकेट रशियाने नष्ट केले. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धातील आतापर्यंतचा रशियावरील हा सर्वात मोठा हल्ला होता अशी कबुली रशियाने पहिल्यांदा दिली.
मागील वर्षी 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. गेल्या जवळपास 10 महिन्यांत या युद्धात हजारो लोक मारले गेले आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनने नाटो सोबत साधलेली जवळीक आणि त्यामुळे रशियाच्या सीमेवर थेट अमेरिकेच्या नेतृत्त्वातील ‘नाटो’ संघटनेने सैन्य येण्याचा धोका या कारणाने रशियाने हे युद्ध केले असल्याचे म्हटले जाते. हे रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. तर, दुसरीकडे युक्रेनला अमेरिकेने शस्त्रास्त्रे आणि इतर मदत पुरवली आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले की, रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपमधील सर्वात मोठा संघर्ष संपवण्यासाठी पाऊल उचलले पाहिजेत. ख्रिसमस पर्यंत युक्रेनमधून त्यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली पाहिजे असे आवाहन केले होते. रशियाने झेलेन्स्की यांचे सैन्य मागे घेण्याचे आवाहन धुडकावून लावले.