झारखंडमधील जैन धर्मियांचं तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला केंद्र सरकारनं पर्यटन स्थळ घोषित केल्यानं सकल जैन समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय. सम्मेद शिखरजी हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचं सांगत जैन समाजातील बांधवांकडून निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान, सम्मेद शिखरला वाचवण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आणखी एका जैन साधूचा मृत्यू झालाय. जयपूरच्या सांगानेर येथील संघीजी जैन मंदिरात 3 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले मुनी समर्थ सागर यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. याआधी मुनी सुज्ञेय सागर महाराज यांनी सम्मेद शिखरासाठी बलिदान दिलं होतं.
मुनी समर्थ सागर महाराज यांचं गुरुवारी मध्यरात्री 1.20 वाजता निधन झालं. मुनी सुज्ञेय सागर महाराजांच्या निधनानंतर समर्थ सागर अन्नपाणी सोडून आमरण उपोषणाला बसले होते. आज शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता संघीजी जैन मंदिरातून मुनिश्रींची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये भाविकांचा मोठा सहभाग होता. सांगानेर येथील जैन समाज मंदिरात सम्मेद शिखर वाचवण्यासाठी मुनी समर्थ सागर महाराज उपोषणाला बसले होते.
ऑल इंडिया दिगंबर जैन यूथ युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक जैन बिट्टू यांनी सांगितलं की, केंद्र सरकार आणि झारखंड सरकारला जैन समाज व सम्मेद शिखराचं महत्त्व कळत नाहीये. गेल्या चार दिवसांत मुनी समर्थ सागर महाराज हे दुसरे मुनीराज आहेत, ज्यांनी सम्मेद शिखरसाठी देहत्याग केला. केंद्र सरकारनं गुरुवारी जारी केलेला आदेश केवळ जैन समाजाची दिशाभूल करण्यासाठी काढण्यात आला आहे. सत्तेच्या बळावर कोणाचा फायदा घेतला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.