शहरातील विविध भागातून बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून आठ पथके तयार केली होती. अवघ्या दहा दिवसांतच पोलिसांनी दमदार कामगिरी करीत हरविलेल्या तब्बल ११६ व्यक्तींना शोधून काढले.
सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्वाखालील सहा पथकांनी शहरातील हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
सात पोलिस ठाण्याअंतर्गत ही मोहीम राबविली गेली. त्यात फौजदार चावडी, एमआयडीसी पोलिसांनी प्रत्येकी १९, जेलरोड पोलिसांनी सहा, सदर बझार पोलिसांनी आठ, विजापूर नाका पोलिसांनी ११, सलगर वस्ती पोलिसांनी नऊ, जोडभावी पेठ पोलिसांनी १५, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सर्वाधिक २९ जणांना शोधून काढले आहे. यापूर्वी ऑपरेशन मुस्कानअंतर्गत १३४ महिला व १३ अल्पवयीन बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते. जानेवारीत विशेष मोहीम राबविली. त्यावेळी १३८ बेपत्ता व्यक्ती व एका बालिकेस आणि फेब्रुवारी २०२४मधील विशेष मोहिमेअंतर्गत ९२ जणांना (४९ पुरुष, ३७ महिला व सहा बालके) पोलिसांनी शोधले होते. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व पथकांचे विशेष अभिनंदन केले आहे.