नागरिकांनी होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षतोड केल्याचे आढळल्यास संबधितांकडून १ लाखापर्यंत दंड आकारला जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या अनेक भागात असे वृक्षतोडीचे प्रकार समोर आल्याने महापालिका प्रशासनाने या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, असा प्रकार आढळल्यास नागरिकांनी तक्रार करण्यासाठी महापालिकेकडून हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आला असून, नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या रविवारी (दि. २४) होळी सण आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. त्यासाठी होळी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोवऱ्या, तसेच लाकडांचा वापर केला जातो. मात्र, शहराच्या वन विभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात; अथवा गुपचूपपणे वापरली जातात.
त्यामुळे महापालिकेडून या वर्षी खबरदारी म्हणून असे प्रकार घडल्यास मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.